इतिहास
सविनय नमस्कार,
व्यक्तीला व्यक्तिमत्व असते तसे एखाद्या गणेशोत्सवाला सुद्धा व्यक्तिमत्व असल्याचा अनुभव येत गेला....
कल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १२४ वे वर्ष आहे. पुढील वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वे) वर्ष आहे. हा गणेशोत्सव अधिक वृद्धिंगत व्हावा,सर्व दूर देशविदेशात त्याची माहिती पोहोचावी म्हणून आम्ही संकेतस्थळ सुरु करीत आहोत. यांत काही त्रुटी आढळल्यास त्या मोकळ्या मनानं आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही आपणा सर्वांशी हितगुज करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचं हे हितगुज सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्री गणरायाच्या दरबारी सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
आज गत दहावर्षांनंतर वाड्याच्याच परिसरात हा गणेशोत्सव साजरा होत आहे. पण वाड्याच्या गणपती उत्सवाचा डामडौल,शान काही कमी झालेली नाही. गत ११० ते ११५ वर्ष ज्या वास्तूत हा गणेशोत्सव साजरा होत होता त्याची काही क्षणचित्रे यांत आपणास पाहायला मिळतीलच पण त्या वैभवशाली क्षणांना साद घातली ती या सुभेदार वाड्यानेच...
सुभेदार वाडा,
मुका..निशब्द...
पण न बोलताही खूप काही व्यक्त करणारा...
स्वत:च्या आनंदात निमग्न...
उत्साहानं सळसळणारा....
सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे तीर्थस्नानच...सुभेदार वाडा...
अचल...सनातन..
युगानुयुगं तपस्यां करणाऱ्या साधुपुरुष्यांच्या सारख्या याच्या भिंती

या भिंतींच अंत:संगीत जेव्हा जाणवू लागत तेंव्हा या भिंती होणं म्हणजे काय ते कळतं !
वाड्याचं कौलारू छप्पर, पाठीमागील माजघर,तिथे असलेलं देवघर, यातील दिवाणखान्यांचे उंबरठे, दरवाजे, खिडक्या आणि या वाड्याची ओटी हे सारं गणेशोत्सव काळात जाणवायचं या वाड्याने काय काय पाहिलं असेल ते सारे सारे डोळ्यापुढे यायला लागायचं, आजही येत..या वाड्याच्या बिंतीना सर्व अचल वस्तुंना बोलता येत असतं तर... तर आज गेल्या १२३ वर्षांचा इतिहास आपल्याला ज्ञात झाला असता नाही कां?
तरीही जो इतिहास छापील स्वरूपात उपलब्ध आहे त्यावर या गणेशोत्सवाची कल्पना येईलच. गणेशोत्सवाच्या शताब्दीवर्षांच्या प्रसंगी काढलेल्या स्मृतिगंध या पुस्तिकेत त्याचा प्रत्यय येईलच.
मानाची अनेक पाने गत १२३ वर्षांत या गणेशोत्सवाला प्राप्त झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गिय लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाच्या दरबारी येवून खास हजेरी लावली होती (सन१९०६) त्यावेळी त्यांनी दिलेल्या काळजापासूनच्या आशीर्वादाने हा गणेशोत्सव बहरला, फुलाला. अनेक उपक्रमांनी आजपर्यंतची सारी वर्ष व मंडळे उल्हासित झाली.
आज सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा हे नाव कल्याण वासियांमध्ये प्रसिद्ध आहे. गेली १२३ वर्षे हा उत्सव परंपरागत पद्धतीनेच साजरा होत आहे. या उत्सव काळांत मंडळात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या मानावा जे संस्कार होतात ते शाळा,कॉलेज मधील वर्षांच्या शिक्षणाहून अधिक किंमतीचे खास आहेत. अशा या उत्सवांच्या वेळीच उत्पन्न झालेल्या धर्म-बुद्धीचाच सर्व आयुष्यभर उपयोग व्हायचा असतो. उदात्त विचार व उग्र मनोवृत्ती ह्याचवेळी जागृत करण्याचे श्रेय या गणेशोत्सवाकडे जाते. ज्यामुळे जिवंत राहण्यात एक प्रकारचा थोरपणा आहे, त्या गोष्टी शिकण्याची शाळा म्हणजेच..
सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव...
सांस्कृतिक विरासतीच्या (वारसा-संचित) ज्या बिंदूवर उभे राहून आपण मागे वळून बघत आहोत त्या ठिकाणाहून नजरेस पडणाऱ्या दृष्याचा केवळ एक अंश इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हा तर आकाशाचा एक तुकडा वा अमृताचा एक थेंब ! तरीही हे संकेतस्थळ म्हणजे समग्रतेचा परिचय करून देऊ शकेल असा 'आज ' सदैव 'काल'च्या खांद्यावर उभा आहे आणि आजवह्या खांद्यावर उभी राहाणार आहे,उदयाला अधिक उज्ज्वल करण्याची प्रेरणा आज आपल्याला काल देत असते.
काल म्हणजे भूतकाळ नाही येऊ घातलेल्या उद्याची ती नांदी असते. आपल्या नव्या पिढीने या नांदीस ओळखावे आणि 'काल'शी परिचित व्हावे अशी शुभकामना मनी बाळगून या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
ही शब्दसुमनांजली गणरायाच्या चरणी अर्पण करतो.